Mumbai Lalbaug Fire : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. 


वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. लेव्हल तीनचा कॉल आगीचं स्वरुप भीषण असताना दिला जातो. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


वन अविघ्न इमारतीच्या 21व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, मुंबईच्या महापौर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर 19व्या मजल्यावर लागलेली आग 5व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. इमारतीचे अनेक मजले आगीनं आपल्या कवेत घेतले आहेत.


अग्नीशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमरातीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अगदी चिंचोळा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पण आगीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाला जिकरीचं होतं आहे. आगीत आतापर्यंत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.