Raj Thackeray Meets Kalpita Pimple : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. फेरीवाल्याच्या हल्ल्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गंभीर जखमी झाल्यात. कालच माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. दरम्यान, फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरु असताना एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. याच हल्ल्यात कल्पिता पिंपळे गंभीर जखमी झाल्या. एवढंच नाहीतर त्यांना आपल्या हाताची बोटं गमवावी लागली. 


भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले की, "मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे." यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतोय. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतायत. न्यायालय देखील त्यांचं कर्तव्य बजावेल, अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे."


काल पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते राज ठाकरे? 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. 


काय आहे प्रकरण?


ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


या फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.