ठाणे : एमआरव्हीसी मार्फत उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम गेली चार वर्ष बंद असल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतप्त झाले आहेत. आव्हाड यांनी ट्वीट करत रेल्वेवर आगपाखड केली आहे. जर या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही तर येत्या काही दिवसात रेल्वे रुळावर बसून रेल्वे बंद करण्याचा इशारा देखील आव्हाड यांनी दिला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पादचारी पुलासाठी सलग दोन दिवस ट्वीट करून रेल्वे अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय. 25 ऑक्टोबरला केलेल्या ट्वीट मध्ये आव्हाड म्हणतात, "मागील 8 दिवसांमध्ये कळवा-मुंब्रा दरम्यान असलेल्या रेतीबंदर येथे रेल्वे रूळ ओलांडताना 8 जणांचा मृत्यू झाला. रेतीबंदर येथे FOB मंजूर झाला होता आणि त्याच्या कामालाही सुरुवात झाली होती (2017), पण अचानक हे काम बंद करण्यात आले. याबाबत रेल्वे विभाग कोणतंही उत्तर द्यायला तयार नाही. या मृत्यूला जबाबदार कोण? काम लवकर सुरु करा. अन्यथा आम्हांला रेल्वे रुळावर बसून रेल्वे बंद करावी लागेल.
याच संदर्भात आज, 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा ट्वीट करून "आम्हांला अक्कल शिकवायला जाऊ नका कि स्लममध्ये हायजीन नसते, स्लममध्ये व्यवस्था नसते. रेल्वेच्या हजारो एकर जमिनीवरती स्लम आहे. त्याच्यासाठी रेल्वेने आजपर्यंत कुठली पावले उचलली?" असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. आव्हाडांच्या या ट्विटला एमआरव्हीसी किंवा मध्य रेल्वेकडून अजून कोणतेही उत्तर आलेले नाही.
मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळांच्या परिसरात रेल्वे प्रशासन आणि एमआरव्हीसीच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण कामे सुरु असून अनेक कामांची रखडपट्टी सुरू आहे. त्यामुळे रेल्वे रूळांवरून चालणाऱ्या स्थानिक नागरिकांचा अपघाती मृत्यूच्या घटना सातत्याने समोर येत आहे. कळवा आणि मुंब्रा दरम्यानच्या झोपडपट्टीच्या भागांमध्ये संरक्षण भिंत नसलेल्या भागातून रेल्वे रुळावर येणारे स्थानिक अनेकवेळा रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडत आहे. रेतीबंदर परिसरातूनही रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या भागात एफओबी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प अपूर्ण राहिला असून याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेला या भागातील परिस्थितीची माहिती देत या भागात आठ दिवसात आठ बळी गेल्याचा दावा करून याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत या भागात एक अपघाती मृत्य झाल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :