Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ज्या प्रकरणात आरोपी आहे, त्याच प्रकरणात आज दोघांना जामीन मिळाला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना आज जामीन मंजूर केला. राजगढिया हा या प्रकरणातील 11वा आरोपी असून त्याला एनसीबीने 2.4 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. त्यांचे वकील अजय दुबे यांनी सांगितले की, मनीष राजगढिया याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. राजगढिया हा व्यावसायिक असून तो गोव्याहून मुंबईला येत असताना त्याला अडवण्यात आले. मनीषकडून 2.4 ग्रॅम गांजा सापडल्याचा आरोप होता. मात्र, त्याच्याकडून काहीही सापडले नसल्याचे पंचनाम्यात लिहिले आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एजन्सीच्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. यादरम्यान क्रूझवरुन ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटसह अनेकांना क्रूझमधून ताब्यात घेण्यात आले. नंतर सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणी एजन्सीने 20 जणांना अटक केली आहे.
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना ट्रायल कोर्टातून जामीन मिळालेला नाही. यानंतर आर्यनने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बुधवारीही न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंमली पदार्थ विरोधी एजन्सी एनसीबीने जामिनाला विरोध करताना सांगितले की तो फक्त ड्रग्ज घेतो असे नाही तर तो अवैध तस्करीमध्येही सहभागी होता.
दुसरीकडे, कोर्टात आर्यनची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, एनसीबीला आर्यनकडून काहीही मिळालेले नाही.
आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन प्रकरणावर आजची सुनावणी संपली आहे. न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची सुनावणी आता उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.