मुंबई  : अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांना तात्काळ जामीनही मिळाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील तरुणाने केली होती. .दरम्यान, आज वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांची दहा हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली.


काय आहे प्रकरण आणि पोस्ट


पंतप्रधानांनी सर्व भारतीयांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याचा सर्वात पहिला विरोध हा जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र देशवासीयांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे बघितल्यानंतर अनंत करमुसे या कासारवडवली येथे राहणार्‍या तरुणाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का, असा सवाल विचारण्यात आला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केले होते. यानंतर या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी रात्री दोन पोलिस आले. त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगितले आणि आपल्याला ते गाडीत बसवून थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर घेऊन आले असे तरुणाचे म्हणणे आहे. हे पोलीस गणवेशात होते तसेच त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होते.


जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आल्यानंतर त्याला सर्वप्रथम फायबर, लाकूड आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी त्याची विचारपूस करून पोस्ट का केली यासंदर्भात त्याला प्रश्न विचारले. तरुणाच्या म्हणण्यानुसार प्रचंड मारहाण झालेली असताना त्याने आव्हाड यांची माफी मागितली आणि त्यांच्या सांगण्यावरून ती पोस्ट डिलीट केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर त्याला मारहाण करण्यात आली असे तरुणाचे म्हणणे आहे. त्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना बोलावून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या तरुणाच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.