ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये एकूण 4 जण दगावल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. 


ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण रुग्णालयात होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 




मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितलं की, "काही वेळापूर्वी ठाण्याती मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली. याचं कारण अद्याप कळालेलं नाही. आतापर्यंत या आगीत काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पोलीस थोड्या वेळात जाहीर करतील. या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. आयसीयूमध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी काही रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु होते." 


पहाटेच्या सुमारास ठाण्यातील या रुग्णालयाला आग लागली. आगीसंदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी बातचित केली असता, पहिल्या मजल्यावरील एका मीटरमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर ही आग संपूर्ण रुग्णालयात पसरली. काही वेळातचं आगीनं रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ उसळत होते. ही आग आयसीयूपर्यंत गेली होती. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे आयसीयूमधील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करत असताना चार रुग्ण दगावल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयात एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर रुग्णांना ठाण्यातील इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Virar Hospital Fire : विरारमधील रुग्णालयातील आगीत 14 जणांचा मृत्यू, दुसऱ्या रुग्णालयात नेताना एका रुग्णाने जीव गमावला