Dombivali News Updates: शिवसेना (Shiv Sena) भाजप (BJP) मधील अंतर्गत वादनंतर पाच महिन्यांनी डोंबिवलीतील (Dombivli) मानपाडा पोलीस ठाण्याला (Manpada Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाला आहे. डोंबिवलीत काही महिन्यांपूर्वी भाजप शिवसेना यांच्यात एका पोलीस निरीक्षकावरून चांगलाच वाद रंगला होता. भाजप पदाधिकाऱ्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. जवळपास तीन-चार महिन्यांपासून डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पद रिक्त होतं. अखेर शेखर बागडे यांची मानपाडा पोलीस स्टेशन येथून बदली झाली. मानपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


शिवसेना-भाजपमधील वादामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे तडकाफडकी सक्तीची रजेवर


शिवसेना-भाजपमधील वादामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना तडकाफडकी शासन आदेशावरुन जूनमध्ये सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना प्रभारी पदभार देण्यात आला होता. शिवसेना-भाजप नेत्यांचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले असल्यानं बागडे यांना ठाणे येथे खंडणी विरोधी पथक आणि होनमाने यांना मानपाडा पोलीस ठाण्यात नियुक्त केलं आहे.


पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावरून भाजप शिवसेना संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला होता. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील शेखर बागडे यांची ऑडिओ क्लिप ट्वीट करून शिवसेना भाजप यांच्या वादात उडी घेतली होती. कल्याण लोकसभेमध्ये भाजप शिवसेना या मतदारसंघांमध्ये शेखर बागडे यांच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची मानपाडा पोलीस स्टेशनवरून बदली झाली आणि या वादावर पडदा पडला असल्याचं शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलं, तर भाजपकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांच्या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली आहे.


भाजप पदाधिकारी नंदू जोशींविरोधात विनयभंगाचा गुन्हा


भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात पीडित महिलेनं केलेल्या आरोपानंतर शेखर बागडे यांनी जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. शेखर बागडे यांनी जाणीवपूर्वक परस्पर हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी  केला होता. त्यानंतर, पोलीस ठाण्यावर भाजपकडून मोर्चा काढण्यात आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी लावून धरली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोपर्यंत शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला होता. या प्रकरणानंतर शेखर बागडे यांना जवळपास तीन ते चार महिने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. 


मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे तीन ते चार महिने चर्चेत होते. ठाण्यातील स्थानिक भाजपासह अजित पवार यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. शेखर बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे 60 कोटी रुपयांची बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार भाजप नेत्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बागडे यांच्यावर निशाणा साधला होता.


तीन-चार महिन्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाला 


तीन ते चार महिन्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यामध्ये जो वाद सुरू होता, हा वाद संपुष्टात आला. त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने हेदेखील चांगले अधिकारी असून ते जनतेची सेवा करतील, असा विश्वास शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी असं स्पष्ट केलं की, मानपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने हजर झाल्यानंतर त्यांचे आम्ही जंगी स्वागत करणार आहोत. त्यानंतरच माध्यमांशी आम्ही बोलू एवढं बोलून त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. 


दरम्यान, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याचप्रमाणे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचं समाधान केलं आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये होनमाने उत्कृष्ट कामगिरी करतील अशी आशा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.