ठाणे : ठाण्यात एक धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या राकेश पाटील या मुलाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राकेश याचाच सावत्र भाऊ सचिन पाटील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राकेश पाटील हा 34 वर्षांचा होता. त्याचा मृतदेह वाशी खाडीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने गुरुवारी पोलीस मृतदेहाचा शोध घेत होते मात्र त्यांचा हाती काही आले नाही. याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सचिन पाटीलचा साथीदार गौरव सिंह याला अटक केली आहे. तर सचिन पाटील हा फरार आहे, त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
माणिक पाटील हे शिवसेनेचे श्रीनगर भागातील नगरसेवक आहेत. त्यांचे घर घोडबंदर रोडवरील वाघबिळ गावात आहे. काही दिवस आधी, ते त्यांच्या पत्नीसह उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल होते. 20 सप्टेंबरला उपचार करून घरी आल्यानंतर त्यांना घरातील तिजोरी फोडल्याचे आढळले. तसेच त्यांचा मुलगा राकेश याचा शोध घेतला असता तो देखील कुठेच आढळला नाही. तर तिजोरीतील साडे तीन किलो सोने देखील गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी माणिक पाटील यांनी राकेश बेपत्ता असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असताना राकेश याचा खून झाला असून तो माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून आझादनगर येथून गौरवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
गौरवने सांगितलेल्या माहिती प्रमाणे, संपत्तीसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचला होता. राकेश हा आपल्या पत्नीसह वेगळा राहत होता. तो माणिक पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा तर सचिन हा तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होते. याचाच राग मनात ठेऊन, 20 सप्टेंबरला सचिनने राकेशवर गोळी झाडून हत्या केल्याचे गौरवने सांगितले. तसेच हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही राकेशचा मृतदेह वाशी खाडीत फेकून दिल्याची कबुली गौरवने दिल्याचे सुत्रांनी सांगितले. हे समजल्यानंतर पोलिसांनी वाशी खाडीत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती आला नाही. राकेशचा खून करणारा त्याचा सावत्र भाऊ सचिन हा फरार आहे. त्याचा शोध घेतला जात असून, याप्रकरणी, कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.