Mumbai Ghatkopar News Updates: मुंबई : घाटकोपरमध्ये (Ghatkopar News) एका उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड (Gujarati Board) तोडून टाकण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) कार्यकर्त्यांकडून एका उद्यानात लावण्यात आलेला 'मारु घाटकोपर' अशा आशयाच्या गुजराती बोर्डाची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीमुळे आता मराठी गुजराती (Marathi Gujarati Dispute) असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं. या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद उफाळून येणार असल्याचं बोललं जात आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर त्यावरुन मोठा वाहदी सोशल मीडियावर सुरू होता. तो फोटो होता घाटकोपर पूर्व येथे लावण्यात आलेला 'मारु घाटकोपर' बोर्ड. घाटकोपर पूर्व येथील एका उद्यानात हा बोर्ड लावण्यात आलेला. हा बोर्ड तात्काळ हटवावा अशी मागणी सातत्यानं मनसेच्या वतीनं महापालिकेकडे केली जात होती. तसेच, महापालिकेला अल्टिमेटमही मनसेच्या वतीनं देण्यात आला होता. मात्र, मध्यरात्री अचानक काही लोकांकडून या बोर्डाची तोडफोड करण्यात आली. 


घाटकोपरमधील तोडफोड करण्यात आलेल्या बोर्डाजवळ एक फलक लावण्यात आला आहे. हा फलक शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचा असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर घाटकोपरमधील 'मारू घाटकोपर' या बोर्डाचा आधीचा फोटो आणि तोडफोड केल्यानंतरचा फोटोही एकत्र करुन शेअर करण्यात येत आहे. तसेच, त्या फोटोवर मुंबईचा मराणीबाणा पुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला, असा मजकूरही लिहिण्यात आला आहे. 




दरम्यान, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' बोर्डाच्या तोडफोडीनंतर आता मराठी गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 


मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतलं.