मुंबई: ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र पाठवले आहे. वरळी येथील बीडीडी चाळ परिसरातील झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना तातडीने भरीव आर्थिक मदत करावी,अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 1 जुलैला वरळीतील गांधी मैदान रोड लगतच्या बीडीडी चाळ क्र. ८९ जवळील गूळभेंडीचे झाड अंगावर पडल्याने अमित जगताप या 45 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहले आहे


अमित जगताप यांच्या मृत्यूमुळे पावसाळयापूर्वी धोकादायक झाडे तोडल्याचा आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी केली असल्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा फोल ठरला आहे. या दुर्घटनेत कुटुंबातील कमावत्या पुरुषाचा मृत्यू झाला असल्याने कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासमक्ष उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यास्तव सदरहू दुर्घटनेत नाहक जीव गमवावा लागलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.


लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईत घवघवीत यश मिळाले होते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात विजय मिळवून मंबईत आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले होते. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. विशेषत: वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणखीनच आक्रमक झाला आहे. 


वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्याची तयारी


गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि मनसेकडून आदित्य ठाकरे यांना वरळीत घेरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गट किंवा मनसेचा एखादा बडा नेता रिंगणात उतरु शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना अवघ्या सहा हजारांचे लीड मिळाले होते. हे आदित्य ठाकरे यांचे अपयश असल्याचे सांगत शिंदे गट आणि मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळीतील ठाकरे गटाचा एखादा नेता गळाला लावण्याचे प्रयत्न महायुतीकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आणखी वाचा


आदित्य ठाकरे वरळीत उभा राहतात की, घाबरुन दुसरा मतदारसंघ शोधतात?; ठाकरे-शिंदे पुत्रांमध्ये जुंपली


राज ठाकरेंसोबत युती करताना नातं आडवं येतं का? मनसे सोबतच्या युतीवर आदित्य ठाकरे स्पष्ट म्हणाले...