मुंबई: महाराष्ट्रातील खारघर येथे महाराष्ट्र भूषण येथे सोहळ्यात घडलेली असलेली चेंगराचेंगरी असो किंवा हाथरसमध्ये घडलेली घटना असो, हे सर्वजण अंधश्रद्धेचे बळी आहेत. या अंधश्रद्धेला देशातील राज्यकर्तेच खतपाणी घालत आहेत. देशातील राजकारणीच बुवा आणि महाराजांना प्रतिष्ठा देतात. त्यामुळे असल्या दुर्घटना घडतात. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. इथूनच भोंदुगिरी सुरु होते, अशा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांसारखं वागलं पाहिजे. पण तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करता, स्वत:ला बाबा म्हणवता. स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून घेता. तुम्ही हिंदू-मुसलमान करता. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे. देशाचा पंतप्रधानच जर अशाप्रकारे भोंदुगिरी करणार असेल तर तुम्ही काय करणार, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र भूषण दुर्घटनेचा उल्लेख करत राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले
यावेळी संजय राऊत यांनी हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरुन उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले. पण ज्याच्यामुळे गुन्हा घडला त्याच्यावरच कारवाई झालेली नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. 80 हजार लोकांची परवानगी असताना हाथरसमध्ये अडीच लाख लोक कसे जमले?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
यावेळी संजय राऊत यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्य़क्रमाचा उल्लेख केला. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन अनेक श्रीसेवकांचा जीव गेला होता. याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले. याप्रकरणात राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. कारण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भर उन्हात हा कार्यक्रम खारघरला घेतला होता. हजारो साधक याठिकाणी जमले होते. भर उन्हात त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, छप्पर नव्हते. देशाचे गृहमंत्रीही त्याठिकाणी उपस्थित होते. त्याठिकाणी पळापळ होऊन अनेकांची जीव गेले. यासाठी राज्य सरकावरच कारवाई झाली पाहिजे होती. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जातात. तेथील कामाख्या मंदिरात रेडे कापतात. पण यांच्यावर कायद्याने कारवाई करणार कोण, असा सवाल राऊत यांनी विचारला.
आणखी वाचा
'240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही'; संजय राऊत नाशिकमधून गरजले