मुंबई : भारताच्या 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा वानखेडेवर उतरला. निमित्त होतं आयपीएल सामन्याआधीच्या सराव सत्राचं.

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन एप्रिल 2011 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर रमेश म्हामुणकर यांनी महेंद्रसिंग धोनी आणि भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातल्या खेळाडूंना ग्राऊंड स्टाफसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. ती त्यांनी तातडीनं मान्य केली.



यावेळी दिग्विजयी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विश्वविजेत्या संघातले सुरेश रैना, हरभजन सिंग आणि झहीर खानही उपस्थित होते. पण या खास फोटोसेशनमध्ये आपण युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांना मिस केल्याचं त्यांनी सांगितलं.

सचिन तेंडुलकर हा सध्या मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. पण सचिन आणि युवराज मैदानावर दाखल न झाल्याने त्या दोघांनाही मिस केल्याचं म्हामुणकर म्हणाले.

2 एप्रिल 2011 ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा सहा विकेट्सनी पराभव करुन विश्वचषकाचा मान पटकावला होता. त्या दिवशी भारताने तब्बल 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. धोनीने अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला, तो क्षण आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजा आहे.