मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक वॉर सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतरही नागरिकांना कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचा पॅकेज दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर आता आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


राज्याला केंद्राने 0.5% मदत केल्याचा आरोप


केंद्र सरकारने संपूर्ण भारताला दिलेल्या 20 लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला 10,715 कोटी रुपये प्राप्त झाले. म्हणजे किती टक्के? आणि केंद्र सरकारने खूप मदत केली, अशी आरडा-ओरड करत बसायची. महाराष्ट्राला वीस लाख कोटीतून दहा हजार सातशे पंधरा कोटी रुपये मिळाले म्हणजे 0.5% टक्के मदत केंद्राने केली आहे. आत्ता बोला? असं ट्वीट आव्हाड यांनी करत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.






भाजप नेते अतुल भातखळकर यांचं उत्तर
जितेंद्र आव्हाड, हे फक्त स्मरणशक्ती कच्ची असलेल्यांसाठी, इतरांना ठावूक आहे की, महाराष्ट्राला कोविड काळात केंद्र सरकारकडून मिळालेली मदत व आत्मनिर्भर पॅकेजमधून महाराष्ट्राला मिळणार्‍या लाभाची संपूर्ण आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी मे 2020 मध्येच सविस्तरपणे दिली होती, असे ट्वीट करत भातखळकर यांनी आव्हाडांना उत्तर दिलं आहे. सोबत मदत केल्याचा एक चार्टही सोबत जोडला आहे.






फडणवीस काय म्हणाले होते?
फडणवीस म्हणाले की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काहीच सांगितलेले नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला. 


ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी जेव्हा देशात लॉकडाऊन केला होता. तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल, त्यांच्या खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले असल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली. लॉकडाउनच्या काळात राज्य सरकार ने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिल्याचा आरोप फडणवीसांनी केला.