मुंबई : मुंबई महापालिकेचं विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असून सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केला आहे. भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्यानं आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मागणी आधी हायकोर्टात केली होती. तेव्हा हायकोर्टाने ती मागणी नाकारली होती. त्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याबाबत अर्ज केला होता. मात्र ही याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेचं विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे.


शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. शिवसेनेची युती तुटल्यानंतर आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पदावर भाजपनं केलेला दावा मुंबई उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टानंही फेटाळून लावला आहे.


2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सरकार असल्यानं भाजपनं विरोधी पक्षात न बसण्याचं ठरवलं होतं. त्यामुळं 30 नगरसेवक संख्येसह सभागृहात तिसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. महापालिका कायद्यानुसार, हे पद देण्यात आलं आहे.


2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भाजपनं महापालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विरोधी पक्षनेते पदावरही दावा केला होता. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्यानं अचानक दावा केलेल्या भाजपला ते देता येत नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं होतं. त्याविरोधात भाजपनं न्यायालयात धाव घेतली होती.


भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्यानं याच पक्षाचा नेता विरोधी पक्षनेते पदी असावा, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. विरोधी पक्षनेते रवी राजा आणि महापालिका प्रशासनाला या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायलयानंतर सुप्रीम कोर्टानंही भाजपची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे, काँग्रेसचे रवी राजा हेच विरोधी पक्षनेते म्हणून कायम राहणार आहेत.


मुंबई महापालिकेत पक्षांचं संख्याबळ


शिवसेना : 97
भाजप : 83
काँग्रेस : 29
राष्ट्रवादी काँग्रेस : 8
समाजवादी पक्ष : 6
मनसे : 1
एमआयएम : 1
अभासे : 1


महत्त्वाच्या इतर बातम्या :