पालघर : कोरोनाच्या संकटात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यात जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्र सरकार आवश्यक तेवढ्या सर्व गोष्टी राज्यात पाठवत आहे. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात जेथे पॉवरफुल मंत्री आहेत, तेथेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर जात आहे. त्यामुळे पालघर सारख्या आदिवासी जिल्ह्याला अनाथासारखं वागवलं जात आहे. तेथे किती पेशंट आहेत याचा विचार न करता 50-100 रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जातात. येथे ऑक्सिज बेड किती लागतील याचा विचारही केला जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या वसईच्या उसगांव येथील एकलव्य गुरुकुल शाळेचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं, त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. 


अमेरिकेनं भारताला काही आठवड्यांसाठी देशभरात लॉकडाऊन लावण्याचा तसेच लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं भारत आपल्या परिने काम करत आहे. सर्वात अधिक वेगाने लसीकरण होणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारताचा जगाच्या तीन देशांमध्ये समावेश होतो. भारताने स्वतः लस विकसित केली आहे. सध्या दर महिन्याला 13 कोटी लस बनत आहेत. काही महिन्यानंतर 16 कोटी लस दर महिन्याला तयार केल्या जाणार आहेत. इतर देशांप्रमाणे आपल्या लोकसंख्येच्या मानाने मृत्यूचा दर आणि रुग्ण संख्येचा दर कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशात लस पाठवण्याच्या केंद्राच्या भूमिकेवर केलेल्या टिकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अजित पवारांचे हे विचार अदूरदर्शी आहेत. आपण इतर देशांना एक कोटी लसी दिल्या. आपण दर महिन्याला 16 कोटी लसी बनवतो. विदेशातून आपण कच्चा माल घेतो आणि त्यांना लस जर देणार नाही तर हे चुकीचं आहे. आपण केलेल्या मदतीमुळेच आज 40 च्या वर देशांची मदत भारताला मिळत आहे. अमेरिकेला त्यावेळी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मदत केल्यामुळे आज अमेरिकेने आपल्याला मदतीचा हात पुढे केला आहे.


श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या वसईच्या उसगांव येथील एकलव्य गुरुकुल शाळेचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.  100 बेडची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. कोविडची प्राथमिक लक्षणे आढळल्यास येथे त्या रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अँटिजन टेस्टही करण्याची सुविधा येथे करण्यात आली आहे.