कल्याण : कोरोनाच्या सध्याच्या कठीण परिस्थितीत ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर अशा सगळ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुढाकार घेत आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला एक व्हेंटिलेटर दिलं आहे. त्यांच्या या सेवा भावनेतून प्रेरणा घेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन नगरपालिकेच्या कोविड सहाय्यता निधीत जमा केलं आहे. ही रक्कम सुमारे 5 लाख इतकी आहे. 


मोहन कुलकर्णी असं व्हेंटिलेटर प्रदान करणाऱ्या सेवानिवृत्त अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिकांचं नाव आहे.  ते अंबरनाथच्या खेर सेक्शन विभागात राहायला होते. अंबरनाथच्या बोरॅक्‍स मोरारजी कंपनीत काम करणारे कुलकर्णी 2003 साली निवृत्त झाले. 2019 साली दुर्दैवाने कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर कुलकर्णी यांना आरोग्य सेवेसाठी काहीतरी योगदान देण्याची मनापासून इच्छा होती. त्यातच सध्याची आणीबाणीची परिस्थिती पाहता कुलकर्णी यांच्याकडे जमा असलेल्या पुंजीतून अंबरनाथ पालिकेला एखादी रुग्णवाहिका घेऊन द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. 


अंबरनाथ नगरपालिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 100 आयसीयू असलेल्या 800 खाटाचे रुग्णालय सुरु केले आहे.  या रुग्णालयासाठी सामाजिक संस्थांनी मदत करण्याचे आवाहन अंबरनाथ नगरपालिकेकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथमधील रहिवासी असलेल्या राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या मोहन कुलकर्णी यांनी आपल्या निवृत्त वेतनातून 7 लाख खर्चून रुग्णालयाला व्हेंटिलेटर दिले आहे. 


मोहन कुलकर्णी यांच्याकडे व्हेंटिलेटर घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दीड लाख रुपये बँकेतून कर्ज घेतलं आणि त्यांच्याकडे असलेल्या जमापुंजीत भर टाकून अंबरनाथ नगरपालिकेला तब्बल सात लाख रुपयांचा व्हेंटिलेटर घेऊन प्रदान केलं आहे. हे व्हेंटिलेटर अंबरनाथ नगरपालिकेच्या डेंटल कॉलेज कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार असून त्याचा अंबरनाथमधील रुग्णांना फायदा होणार आहे.