Mumbai Cruise Drug Case :  मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जातात. आज भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.


मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी आधी एक फोटो दाखवला की किरण गोसावी हा आर्यन सोबत सेल्फी काढत आहे. त्यानंतर दुसरा फोटो दाखवला त्यामध्ये मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे आर्यनला एनसीबी कार्यालयात घेऊन जात आहेत. पण यामागे सुनील पाटील असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हे गेल्या 20 वर्षांपासून याचे राष्ट्रवादीचे संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.


सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. 20 वर्षांपासून त्यांचे राष्ट्रवादी पक्षासोबत संबंध राहिले आहेत. फक्त संबंधच नाही, तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांचे ते चांगले मित्र आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरचे संबंध असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केलाय.


अनिल देशमुखांवर इडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत असल्याचंही कंबोज म्हणाले. 2014 ला जेव्हा सरकार बदलले तेव्हा तो गायब झाला मात्र पुन्हा 2019 ला सरकार आले तेव्हा तो पुन्हा सक्रिय झाला आहे. या बदलीच्या रॅकेटची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कंबोज यांनी केलीय. तर नवाब मलिक यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्याचे थेट ड्रग माफिया यांच्याशी संबंध उघड होत आहेत. मलिक यांनी मला धमकी दिली पण मी घाबरणार नाही, या पत्रकार परिषदेनंतर माझ्या जिवाला धोका असल्याचंही कंबोज म्हणाले.


मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सॅम डिसूझा यांचा उल्लेख आजवर सर्वांनी केला. सुनील पाटील याने सॅम डिसोझा याला वॉट्स चॅट केले आणि कॉल देखील केले आहेत. त्यांनी सांगितले मुंबईत क्रूझ पार्टी होत आहे. 27 लोकांची नावे आहेत. मला एनसीबी विभागाशी मिळवून दे, असे सॅम डिसोझा याला सांगितले. 2 तारखेला सुनील पाटील याने सॅम डिसोझाला सांगितले की, माझ्या माणसाला एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी भेट करून द्या. त्यानंतर सुनील पाटील याने किरण गोसावी याचा नंबर सॅम डिसोझा याला दिल्याचं मोहित कंबोज म्हणाले.


राष्ट्रवादीच्या जवळ असलेल्या या माणसाला कशी काय माहिती मिळते, असा प्रश्न मोहित कंबोज यांनी उपस्थित केला आहे. मागील एक महिन्यात एक खोटी स्टोरी बनवली गेली. सुनील पाटील याला पुढे करून षडयंत्र रचले याचे उत्तर सरकारमधील मंत्र्यांना द्यावे लागेल असं मोहित कंबोज म्हणाले.


महत्वाच्या बातम्या :