मुंबई : आर्यन खान प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण लागलं असून त्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात नवाब मलिक आणि संजय राऊतांनी ज्या सॅम डिसूझावर आरोप केले होते त्या सॅम डिसूझाशी एबीपीने संवाद साधला. आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये सापडल्यानंतर शाहरूख आणि एनसीबीमध्ये कशा प्रकारची पैशाची देवाण-घेवाण झाली, किरण गोसावीचा यामध्ये काय रोल होता याबाबत मोठा खुलासा सॅम डिसूझाने केला आहे. 


सॅम डिसूझा एबीपी माझाशी बोलताना म्हणाला की, "माझं या प्रकरणाशी काही घेणं देणं नाही. मला सुनिल पाटील या व्यक्तीचा कॉल आलेला. त्याला क्रूझ ड्रग्ज पार्टीसंबंधी काहीतरी महत्वाची माहिती असल्याचं त्याने सांगितलं आणि एनसीबीशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. त्यानंतर मला किरण गोसावीचा कॉल आला. मला या प्रकरणात पडायचं नव्हतं, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट त्याला दिला. नंतर त्यांच्यामध्ये या संबंधी काही बोलणं झालं. त्यानंतर मला साडे आठच्या दरम्यान या पार्टीसंबंधी काही अपडेट येणार असल्याचा कॉल आला. त्यावेळी आपण पहिल्यांदा किरण गोसावीला भेटलो. त्यानंतर मला सुनिल पाटीलचा कॉल आला आणि यामध्ये कोण सेलिब्रेटीचा मुलगा आहे ते चेक करायला सांगितलं. " 


सॅम डिसूझा पुढे म्हणाला की, "आर्यन खान जवळ कोणतंही ड्रग्ज नसल्याचं किरण गोसावीनं मला सागितलं.. त्यामुळे त्याला मदत करण्याचं तो बोलला. केस क्लिअर असल्याने आपण त्यावेळी यामध्ये मध्यस्ती करण्याचं मान्य केलं."


आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलंच नसल्याचं सॅम डिसूझाने सांगितलं, तसंच किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचा दावा त्याने केला आहे. सॅम डिसूझा म्हणाला की, "किरण गोसावीने आर्यनचा व्हॉईस कॉल रेकॉर्ड केला. 'पापा, आयएम अॅट एनसीबी' असं आर्यनने त्यामध्ये बोललं होतं. त्यानंतर हा मोबाईल घेऊन किरण गोसावी एनसीबी ऑफिसच्या बाहेर आला. त्या ठिकाणी मी, किरण गोसावी, पूजा ददलानी आणि चिकी पांडे होतो. "


सॅम डिसूझा म्हणाला की, "आर्यन निर्दोष आहे म्हणून त्याला मदत केली पाहिजे असं किरण गोसावीने मला सांगितलं. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडलं नसल्याने मी मध्यस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुनिल पाटील यांचा कॉल आला. या प्रकरणातील 50 लाख रुपयांची टोकन अमाऊंट घेण्याचं ठरलं. पहिला 38 लाख किरण गोसावी आणि नंतर  5  लाख प्रभाकर साईलकडून  आले.  सुनील पाटील कॉर्डीनेटर होते. त्यांच्या सोबत माझं बोलणं सुरु होतं."


सुनील पाटील  कोण आहेत ? 
सुनिल पाटील हा पॉवर ब्रोकर आहेत. त्याचे राजकारणी लोकांसोबत चांगले संबंध आहेत. दिल्ली, गुजरात या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. या पार्टीची टिप सुनील पाटील यांच्याकडून मिळाली. 


मी फक्त मध्यस्ताचं काम केलं, माझा या प्रकरणाशी संबंध नाही. किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून वेळ आल्यानंतर या संबंधी सगळा खुलासा करणार असल्याची माहिती सॅम डिसूझाने दिली आहे.