मुंबई : महाराष्ट्रातील चित्र आणि शिल्प कलाकारांची माहिती साऱ्या जगाला व्हावी, महाराष्ट्रातली कला परंपरा जगभरातील लोकांना कळावी या उद्देशानं आज 'महाराष्ट्राच्या चित्र शिल्पकला' या कोशाचे प्रकाशन करण्यात आले. देशात अशा प्रकारच्या कोशाच्या निर्मितीचा हा पहिला प्रयोग आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सर जमशेदजी जीजीभॉय यांचे वंशज रुस्तम जीजीभॉय यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जे. जे कला महाविद्यालयात पार पडला. 2 मार्च हा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा 164 वा स्थापना दिवस. त्यानिमित्तानं या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


या पुस्तकात 18व्या शतकापासूनच्या 307 चित्रकार आणि शिल्पकारांची माहिती आहे. त्याचसोबत कलाकारांवरील चरित्रात्मक नोंदीही यात असल्याची माहिती आहे. त्याचसोबत 4 चित्र शिल्पकलेच्या संस्थांबद्दलचा प्रवासही या पुस्तकातून उलगडला जाणार आहे. या कोशात 1700 पेक्षा जास्त चित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. 'Encyclopedia visual art of Maharashtra'(एन्साय्क्लोपीडिया व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र) असं नाव असलेल्या या 900 पानी पुस्तकाची किंमत चार हजार रुपये आहे. या पुस्तकाचे संपादन सुहास बहुळकर आणि दीपक घारे यांनी केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी तब्बल सहा वर्षांचा अवधी लागल्याची माहिती आहे. या कोशाची प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्राचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या दृश्यकलेचा प्रवास असून अशा प्रकारची मांडणी प्रथमच होत आहे. याशिवाय या सर जे. जे स्कूल ऑफ आर्ट (1857), द बॉम्बे आर्ट सोसायटी (1888), द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (1918) आणि आर्टिस्ट सेंटर(1939) या कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चार संस्थांचा इतिहास प्रथमच नोंदवला गेला आहे.


'बॉम्बे स्कूल ऑफ ट्रेडिशन'च्या शैलीत काम करणाऱ्या कलाकारांचं काम जगासमोर यावं यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या शैलीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांची माहितीच लोकांना नसल्यानं आधी 2013 साली मराठी कोशाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यात अधिक माहिती गोळा करत इंग्रजीत या कोशाचे प्रकाशन करण्यात आले अशी माहिती या कोशाचे संपादन केलेल्या सुहास बहुळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


अनेक ठिकाणी पुतळ्यांची निर्मिती केली जाते. यात अगदी संसद भवन परिसरातही महाराष्ट्रातल्या कलावंतांनी पुतळ्यांची निर्मिती केली आहे. मात्र, त्या पुतळ्यांखाली शिल्पकारांचं नाव दिलं जात नाही, अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. शिल्पकाराचं नाव पुतळ्याखाली देण्यात यावं यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे असंही ते म्हणालेत.


पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेल्या रुस्तम जीजीभॉय यांनी या पुस्तकाबद्दल गौरवौद्गार काढलेत. या पुस्तकामुळे बॉम्बे स्कूल ऑफ ट्रेडिशनच्या शैलीत काम करणाऱ्या कलावंतांचं डॉक्युमेंटेशन होणार असून त्यामुळे याचा मोठा फायदा होईल. ही जे जे कला महाविद्यालयासाठी मोठी कौतुकाची बाब असल्याचंही जीजीभॉय म्हणालेत.


यावेळी व्यासपीठावर जे जे चे डिन साबळे, संपादक दीपक घारे आणि सुहास बहुळकर, रुस्तम जीजीभॉय आणि आणि पंडोल आर्ट गॅलरीचे दादीबा पंडोल उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.