मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद रंगत असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयात संजय राठोड यांच्याविरोधात फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर प्रकरणी पुण्याच्या वानवडी पोलिसांच्या तपासावरही याचिकेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपला तपास योग्य पद्धतीने केला नसून त्यांनी गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर न्यायमूर्त एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


काय आहे प्रकरण?


मूळची बीडची असलेली 22 वर्षीय पूजा चव्हाण ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळे ती प्रचंड लोकप्रिय होती. 8 फेब्रुवारी रोजी पूजाने अचानक राहत्या घरातील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर हे प्रकरण पाच दिवस शांत होतं. दरम्यान वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाणशी संबंधित काही ध्वनीफिती मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. त्यावरून पूजा आत्महत्या करणार असल्याची माहिती काही लोकांना अगोदरच होती. त्यानंतर या ध्वनीफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि या प्रकरणात शिवसनेच्यावतीनं महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांचा थेट संबंध असल्याचे समोर आलं. त्यानंतर हे प्रकरण पेटत गेलं आणि अखेरीस संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :