मुंबई : नाणार प्रकल्पावर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याचा इशारा दिला असताना त्यांना पुन्हा एका महत्त्वपूर्ण बैठकीतून डावलण्याचा प्रकार समोर आला आहे.


मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि देशातील बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात पार पडली.

या बैठकीला उद्योगपती मुकेश अंबानी, आदी गोदरेज, आनंद महिंद्रा, अजय पिरामल, कुमारमंगलम बिर्ला, दीपक पारेख, आदित्य पुरी उपस्थित होते. मात्र या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

दिवसभरात मोदींच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा सहभाग नव्हता. त्यात सुभाष देसाई मुंबई शहराचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री असूनही त्यांना डावलण्यात का आलं, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या धुसफुसीचा आणखी एक नवा अंक सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाणार आणि उद्योगपतींच्या बैठकीतून डावलल्याचा मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.