मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. घरापासून दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्यातील ज्या गावांमध्ये वस्तीमध्ये किंवा वाड्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून एक किमीपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत तीन किमीपर्यंत शाळा नसल्यास वाहतूक भत्ता दिला जाणार आहे
यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या राहत्या घरांची माहिती प्राथमिक शिक्षण संचलनालाय पुणे या ठिकाणी पाठवायची आहे.
ज्या गावामध्ये शाळा नाही किंवा माध्यमिक शाळा नाही, तसेच विद्यार्थ्यांचे घर हे शाळेपासून अधिक अंतरावर आहे, ज्या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे, ज्यांचा नजीकच्या शाळेमध्ये समावेश होणार नाही, अशा कारणांवर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देणे गरजेचे असल्याचा शिक्षण परिषदेच्या बैठकीत निर्णय झाला.
त्यामुळे अशा गाव/ वस्ती/ वाडे यांची नावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसाच्या आत समग्र शिक्षा कार्यलयास सादर करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक केंद्रामध्ये विखुरलेल्या व कमी पटसंख्या असलेल्या प्रत्येक केंद्रातील तीन शाळा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांनी नियोजन करायच्या सूचनाही देण्यात आला आहेत.