भिवंडी : भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्डयांविरोधात श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी अनोखे आंदोलन केलं. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीविरोधात हे आंदोलन होतं दणका दिला आहे.


श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत खड्ड्यांना मंत्र्यांची नावे दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सुप्रीम कंपनीचे अधिकारी यांची नावे खड्ड्यांना दिली. 1 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे भरले नाही, तर टोल नाका बंद करु, असा इशारा देखील श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हाप्रमुख प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.


भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग 350 कोटी रुपये खर्चून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बीओटी तत्वावर तयार केला आहे. मात्र हा मार्ग संपूर्ण खड्डेमय झाला आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने ठेकेदार आणि अधिकारी यांच्या विरोधात प्रचंड संताप नागरिकांमध्ये आहे.


श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना या रस्त्यावर भिवंडी ते अंबाडी दरम्यान तब्बल 1733 खड्डे आढळले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा हजार रुपये असं गेल्यावर्षी म्हटलं होतं. त्यानुसार श्रमजीवी संघटनेच्या युवक आघाडीने सरकारला एक मागणीपत्र  देऊन प्रति खड्डा एक हजार रुपये याप्रमाणे 17 लाख 33 हजार रुपये बक्षिसाची मागणी करणारं निवेदन केलं आहे. तर खड्डेमय रस्ता बनविणारे अधिकारी आणि ठेकेदार यांना आदर्श खड्डेमय ठेकेदार अधिकारी पुरस्कार देण्यात आला.