मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याची दखल आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.


अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत."





मुख्यमंत्र्याकडून 8 दिवसांचा अल्टिमेटम

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी 21 फेब्रुवारी रोजी जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. राज्यात लॉकडाउन नको असेल, तर लोकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सतत होत धुणे आवश्यक आहे. लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यात सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.