करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची दिल्लीत भेट झाल्याची जी माहिती आली आहे. त्याचा संदर्भ हा लेखक, अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या पद्मभूषण पुरस्कार वितरण संमारंभातील आहे. ही घटना 1973 सालची. अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना 1973 साली जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला जाणार होते. त्यावेळी करीम लाला यांनी चट्टोपाध्याय यांच्याकडे राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि करीम लाला यांचे मैत्रीचे संबंध असल्याने चट्टोपाध्याय त्यांना घेऊन दिल्लीला आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी देशातीन प्रसिद्ध लोक आले होते. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही समावेश होता. पुरस्कार वितरणानंतर लोक जेव्हा आपापसात चर्चा करत होते, त्यावेळी करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. सोबतच त्यांच्यासोबत फोटोही काढला. करीम लाला याने पठाणांचा नेता म्हणून त्याची ओळख करुन दिली. इतर अंडरवर्ल्ड डॉन प्रमाणेच करीम लाला याचेही चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या या एकमेव भेटीव्यतिरीक्त या दोघांची भेट झाली असल्याचे पुरावे मिळत नाहीत.
राऊतांचे विधान खरे आहे : हाजी मस्तानचा मुलगा सुलेमान मिर्जा
संजय राऊतांच्या विधानाला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा मुलगा सुलेमान मिर्जाने दुजोरा दिला आहे. करीम लाला हे पक्के काँग्रेसी होते. मुंबईतील कार्यक्रमावेळी इंदिरा गांधी त्यांना भेटण्यासाठी येत असल्याचा दावा केला आहे. सोबतच इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये चर्चा होत असल्याचंही सुलेमानने म्हटलं आहे. करीम लाला हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने निवडणुकीच्या काळातही ते काँग्रेसला मदत करत होते. काँग्रेसचे तत्कालीन नेते मुरली देवरा, वसंतदादा पाटील, वसंत नाईक यांच्या बंगल्यावर करीम लाला नेहमी येत-जात असल्याचा दावाही सुलेमान मिर्जाने केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील हाजी मस्तान आणि करीम लाला यांचे चांगले संबंध असल्याचे सुलेमान मिर्जाने सांगितले.
मुंबईत एकही भेट झाल्याचे पुरावे नाही : ज्येष्ठ पत्रकार
करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट झाली, या राऊतांच्या विधानामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. करीम लाला इंदिरा गांधी यांना भेटला अशी चर्चा होती. पण पुरावा नाही. एकदा दोनदा करीम लाला इंदिरा गांधींना लग्न समारंभात भेटल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याबद्दल ठोस पुरावे नाहीत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनी दिली. ते म्हणाले, हाजी मस्तानला मी स्वतः दोनवेळा मंत्रालयात आलेलं पाहिलं आहे. त्यावेळी काँग्रेस नेत्यांना भेटायला तो यायचा. हाजी मस्तानने पक्ष देखील काढला होता. मात्र, तो निवडणुकीत पडला. जयप्रकाश नारायण चळवळीच्या वेळेस हाजी मस्तान शरण आला होता. पण त्याचे काँग्रेस पक्षतील नेत्यांशी चांगले संबंध होते.
शरद पवार यांच्यावरही आरोप झाले -
शरद पवार हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर देखील अंडरवर्ल्डच्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप झाले आहेत. मात्र ते सिद्ध झाले नाही. पण, अनेक पक्षातील नेत्यांचे हाजी मस्तानशी चांगले संबंध होते. इंदिरा गांधी इतक्या मोठ्या होत्या. त्या हाजी मस्तानला कधीच पायधुनी या ठिकाणी भेटायला येणं शक्य नसल्याचे सांगत राऊत यांच्या वक्तव्य फेटाळले आहे.
ज्येष्ठ पत्रकार राम पवार म्हणतात...
करीम लाला आणि इंदिरा गांधी यांचा जो फोटो मिळाला आहे. त्यात हरिभाऊ चटोपाध्याय यांना जेव्हा पद्मश्री मिळाला तेव्हाचा आहे. चटोपाध्याय आणि करीम लालाचे संबंध चांगले असल्याने त्यांच्यासोबत ते दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. मात्र, इंदिरा गांधी करीम लाला भेटायला यायची याबाबत कुठल्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार राम पवार यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की मी अनेक लोकांशी चर्चा केली. करीम लाला मंत्रालायत यायचा त्याचा काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. मुरली देवरा त्याच्या भागातून निवडून यायचे मात्र त्यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते हे सांगणे अवघड आहे.
एखादी दंगल शांत करण्यासाठी हे राजकीय नेते या लोकांशी भेटत होते. याबाबत काहीच दुमत नाही. राजकीय कामासाठी हाजी मस्तान हे मंत्रालयात येत होते. मात्र, इतका आदर त्यांना दिला जायचा असं काही नव्हतं. त्यावेळेसचे राष्ट्रपती जेलसिंग 1974 ला मुंबईत जातीय दंगली झाल्या त्यावेळेस आले असताना त्यांच्या जीपमध्ये हाजी मस्तान होता. मग ते जेलसिंग यांना माहीत होतं की नाही? हे माहीत नाही. राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध असतात. पण त्याचे पुरावे मात्र मिळत नाही. कारण, राजकीय सपोर्ट असल्याशिवाय अंडरवर्ल्डमधील लोक इतके मोठे होऊच शकत नाही. मुस्लीम मतदार संघामध्ये अंडरवर्ल्डच्या या लोकांचं दबदबा होता. त्यामुळे अंडरवर्ल्डचे हे लोक राजकीय नेत्यांच्या जवळचे जवळचे झाले होते.
संबंधित बातम्या :
- राऊत वेगळ्या संदर्भाने बोलले, त्यांचा हेतू साफ, आदित्य ठाकरेंकडून संजय राऊतांची पाठराखण
- करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या भेटीबाबतचं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून मागे
- करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
Sanjay Raut PC | करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद | ABP Majha