मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत शिवसेना खासदार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर संजय राऊत यांनी आपलं विधान मागे घेतलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे.' दरम्यान संजय राऊत यांनी लोकमत वृत्तपत्राच्या एक कार्यक्रमात बोलताना आपले पत्रकारीतेतील अनुभव सांगत होते. त्यावेळी ते म्हणाले की, 'आज अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी होत आहे. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिलं आहे, ज्यावेळी डॉन हाजी मस्तान मंत्रालयात जात होता. त्यावेळी मंत्रालयातील लोक त्याच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभे राहत असत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील मुंबईचे डॉन करीम लाला यांना पायधुनी येथे जाऊन भेटत असत.'


या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस प्रवक्ते चरण सिंह सापरा यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी जी वक्यव्य केली त्याबाबतचे पुरावे त्यांनी द्यावे. ते म्हणाले की, आम्ही त्यांच्या या वक्तव्यांना दुजोरा देत नाही. तसेच भाजपने सांगितले की, काँग्रेस आणि अंडरवर्ल्डचं फार जुनं नातं आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत यांनी जी वक्तव्य केली ती खरी असतील तर याप्रकरणी सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे. तर इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर मग काँग्रेस पक्षाला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. फडणवीस यांनी मागणी केली आहे की, काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.


पाहा व्हिडीओ : काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे



अफगाणिस्थानातून आलेल्या आठ पठाणांचे नेते होते करिम लाला : राऊत


संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 'करीम लालाची भेट सर्व राष्ट्रीय नेते घेत असत. ते अफगाणिस्थानाहून आलेल्या पठाणांचे नेते होते आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते त्यांची भेट घेत असतं.' ते म्हणाले की, 'इंदिरा गांधीही एक पठाण नेता म्हणूनच त्याला भेटत असत.' संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'करीम लाला याच्या ऑफिसमध्ये अनेक नेत्यांचे फोटोही लावलेले होते. खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत करीम लाला काम करत होता.'


कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला?


करीम लाला याला अब्दुल करीम शेर खान या नावाने ओळखलं जात असून 1930मध्ये तो भारतात आला होता. तो 1960पासून 80च्या दशकापर्यंत दारूची तस्करी, जुगाराचे अड्डे, जबरदस्ती वसुलीचं रॅकेट चालवत होता. त्याचबरोबर सोनं, चांदी आणि हत्यारांच्या अवैध धंदाही करत होता. असं सांगण्यात येतं की, अमिताभ बच्चन यांचा गाजलेला चित्रपट 'जंजीर'मध्ये अभिनेते प्राण यांनी जी भूमिका साकारली होती. ती करीम लालावर आधारित होती. करीम लालाचा मृत्यू 2002मध्ये वयाच्या 90व्या वर्षी झाला.


दरम्यान, मुंबईमध्ये 90च्या दशकापर्यंत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. यांपैकी डॉनमध्ये हाजी मस्तान, अबू सलेम, अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम ही काही प्रमुख नावं होती. यादरम्यान अधिकाधिक वेळेपर्यंत केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. इंदिरा गांधी पहिल्यांदा 1966मध्ये पंतप्रधान बनल्या होत्या, त्यानंतर जनता सरकारच्या प्रयोगानंतर त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या. त्या 1984 पर्यंत त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं.


संबंधित बातम्या : 


कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला?


करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण