मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीबाबतची नोटीस स्थगित करण्यात आली आहे. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे. गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीस प्रकरणी आज (9 फेब्रुवारी) विधानभवनात बैठक पार पडली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीला गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, तसंच जलसंधारण विभागाचे अधिकारी मोघे उपस्थित होते.


पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेले ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना नुकतंच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. तर दुसऱ्याच दिवशी निस्वार्थ भावनेने पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा 1 कोटी 86 लाखाचा कर थकल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना जप्तीची नोटीस बजावली होती. त्यामुळे एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा काहीशा अवस्थेला गिरीश प्रभुणे यांना सामोरं जावं लागलं होतं. यावरुन भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर टीकाही झाली होती. याप्रकरणी तात्काळ तोडगा काढण्याचं निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत या नोटीसला स्थगिती देऊन कर कमी आकारण्याची सूचना त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला केली.


कमीत कमी मुख्य कर आकारण्याची सूचना : नीलम गोऱ्हे
संस्थेला पाठवलेल्या नोटीसला स्थगिती दिल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं. त्या पुढे म्हणाल्या की, "निळ्या पूररेषेतून गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेची बांधकामे वगळण्याची सूचना जलसंधारण खात्याला दिली आहे. मुख्य कर जेवढा कमीत कमी आकारता येईल तेवढा कमी कर आकारावा. पुलाच्या बांधकामासाठी एक शाळा पाडली जाणार आहे, त्यासाठी पर्यायी जागा द्यावी. शाळेच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व परवानग्या पिंपरी चिंचवड महापालिका देणार आहे."


कर भरण्यासाठी पुरेसा कालावधी देणार : पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त
"दोन संस्थांना जी नोटीस दिली आहे, त्याची फेरपडताळणी करण्यात आली. त्यांना हा कर भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल. योग्य करनिर्धारण केलं जाईल, त्यामुळे कर कमी होईल," अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.


कमी झालेला कर मुदतीत भरु : गिरीश प्रभुणे
"नीलम गोऱ्हे यांनी ही बातमी वाचल्यावर तातडीने आमच्याशी संपर्क केला. आजच्या बैठकीत ज्या सूचना केल्या आहेत त्यामुळे पुढल्या महिन्याभरात हा प्रश्न योग्य पद्धतीने सुटेल. दोन्ही शाळांचा 3 ते 3.5 कोटी कर होता, तो आता 5 ते 10 टक्क्यांवर येईल, तो आम्ही काही मुदतीत भरु. यातून काही उत्पन्न येत नाही, देणगी गोळा करुन हा कर भरावा लागेल. आम्ही समाधानी आहोत जी समस्या होती ती दूर होईल," अशी प्रतिक्रिया गिरीश प्रभुणे यांनी दिली.