मुंबई : नवी मुंबईची पुढील 50 वर्षांची कचऱ्याची समस्या दूर झाली आहे. कारण, नवी मुंबई महापालिकेला 36 एकर जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी देण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी भरावे लागणारे 192 कोटींपैकी 92 कोटी रुपये माफ करण्यात आले.

नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापुढे नवी मुंबईकरांना सिडकोला ट्रान्सफर फी आणि चेंज ऑफ युजचे पैसे भरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एवढंच नव्हे, तर सिडकोच्या लिजचा कालावधी 60 वर्षांवरुन 90 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. नवी मुंबईकरांना भरावे लागणारे या लीजचे पैसेही 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न डोकं वर काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कचराप्रश्नी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सध्या औरंगाबादचा कचरा प्रश्न गाजत आहे.