मुंबई : मुंबईतल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच महानगर पालिकेतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करुन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळी शिवसेनेच्या वचननाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ होण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांनी 700 फुटांच्या घरांवर मालमत्ता कर माफीची घोषणा केल्यानं भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं सर्वच महापालिकेतील घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या कर माफीमुळे मुंबई महापालिकेला तब्बल 600 कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागणार आहे. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त मुंबईकरांना कर भरावा लागणार नाही. एकीकडे जकात बंदीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आधीच आटला आहे. गेल्या 6 वर्षात साडे पाच हजार कोटींचा मालमत्ताकर बुडाला आहे.

मालमत्ता करमाफी देऊन मुंबईकरांना खुश करण्याचा सेना-भाजप आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण 700 स्क्वेअर फुटांची कोट्यवधींची घरं विकत घेणाऱ्या मुंबईकरांना करमाफीची गरज आहे का? असा प्रश्न आता विरोधक विचारु लागले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईतील 500 फूटापर्यंतची घरं टॅक्स फ्री, पालिकेत ठराव एकमतानं मंजूर