मुंबई : पर्यावरण पूरक आणि पीओपी मूर्तीतील फरक कळवा यासाठी गणेश मूर्तींवर शिक्के मारण्याचा आदेश मुंबई महापालिकेने मागे घेतला आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या काळात पर्यावरण पूरक आणि इतर गणेश मूर्तींमधील (Ganesh Idol) फरक समजावा याकरता मुंबई महापालिकेतर्फे (Mumbai Municipal Corporation) गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्राद्वारे कळवलं आहे. 


मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही : मंगल प्रभात लोढा


"गणेश उत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणं किंवा रंग देणं योग्य नाही. यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत मी स्वतः महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी बोललो आहे," असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.


गणेशोत्सवाच्या प्राथमिक बैठकीतच मूर्तींवर शिक्का मारण्याची सूचना रद्द : बीएमसी


त्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने संबंधित आदेश मागे घेतले आहेत. "श्री गणेश मूर्तींवर शिक्का मारण्याची सूचना गणेशोत्सवाच्या प्राथमिक बैठकीतच रद्द करण्यात आली आहे," असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने आदेश मागे घेताना दिलं होतं. महापालिकेने म्हटलं की, "यंदाच्या गणेशोत्सव सणासाठी प्रशासनामार्फत सुरुवातीलाच आयोजित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत पर्यावरण पूरक गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी 'मार्क' करण्याचा विषय चर्चेला आला होता. याच बैठकीत गणेश मूर्तींवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तीकारांना त्यावेळीच देण्यात आल्या होत्या." "मूर्तीकारांनीही या सूचनेचं तंतोतंत पालन करावं," असं आवाहन पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.  


हेही वाचा


POP Ganesh Idol : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट वगळली