मुंबई :साल 2013 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवूरन टाकणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज आपला अंतिम फैसला सुनावला. हायकोर्टानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठानं सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाचं वाचन केलं.
हायकोर्टाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे.
असा होता घटनाक्रम
22 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या एका सहकाऱ्यासह एक महिला फोटो जर्नलिस्ट शक्ति मिल परिसरात कव्हरेजसाठी गेली होती.
महालक्ष्मी परिसरात सुनसान अशी बंद पडलेली ही मिल. सायंकाळी सहा वाजता महिला पत्रकार आणि तिच्या सहकाऱ्याला काही लोकांनी पोलिस असल्याचं सांगत फोटो काढू नका असं सांगितलं.
त्या लोकांनी म्हटलं की आमच्या परवानगी शिवाय फोटो काढू शकत नाहीत.
नंतर त्यांनी महिला पत्रकार आणि त्याच्या सहकाऱ्याला आतमध्ये नेलं.
आत गेल्यावर दोघांवर हल्ला केला आणि महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याला तिथं बांधून ठेवलं.
त्यानंतर महिला पत्रकारासोबत पाच लोकांनी गॅंगरेप केला.
दोन तासानंतर कसंबसं दोघांनी तिथून आपली सुटका केली आणि हॉस्पीटल गाठलं.
डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेने पोलिस देखील हादरुन गेले.
72 तासात पोलिसांनी सर्व पाच आरोपीनं अटक केली
चौकशी दरम्यान आणखी एक गॅंगरेपचं प्रकरण समोर आलं. यातील तीन आरोपींनी शक्ती मिल परिसरातच आणखी एक गँगरेप केला होता.
आरोपींच्या अटकेनंतर काही दिवसांनी एक कॉल सेंटरमध्ये काम करणारी टेलिफोन ऑपरेटर समोर आली जिनं तिच्यावर तिघांनी रेप केला असल्याचं सांगितलं.
31 जुलै 2013 रोजी शक्ति मिल परिसरात तिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाला होता.
पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात आरोपींवर ऑक्टोबर 2013 मध्ये 362 पानांची चार्जशीट फाईल केली.
दोन्ही प्रकरणात पीडितांकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यानंतर आरोपींना दोषी मानलं गेलं.
अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ते अशा प्रकारच्या शिकार आपली वासना मिटवण्यासाठी शोधत होते.
आरोपींनी सांगितलं होतं की, ते मदनपुरा, भायखळा आणि आगरीपाडा परिसरात नियमित पॉर्न फिल्म्स पाहायचे. सोबतच रेड लाईट परिसरातही त्यांचं येणं जाणं असायचं.
आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि एक अल्पवयीन आरोपीनं चौकशीत सांगितलं होतं की, ते नेहमी पॉर्न फिल्म पाहायचे.
रेप केल्यानंतर आरोपींनी पावभाजी खाल्ली
महिला पत्रकारासोबत रेप करणारा अल्पवयीन आरोपी ज्यावेळी घरी आला त्यावेळी त्याला कुठलाही पश्चाताप नव्हता. तो चिकनच्या दुकानावर कामाला होता.
दोन्ही गॅंगरेप प्रकरणी एप्रिल 2014 मध्ये सेशन कोर्टात निर्णय सुनावला.
विजय जाधव (19 वर्ष), मोहम्मद कासिम शेख (21 वर्ष) आणि मोहम्मद अंसारी (28 वर्ष) दोन्ही प्रकरणात दोषी सिद्ध झाले. या तिघांना दोन वेळा गँगरेप केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.