नवी मुंबई : नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलकडून फी न भरणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत शाळेत विचारणा करायला गेलेल्या पालकांना देखील शाळेने बंद करून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पालकांना बाहेर सोडले गेले.


कोरोना काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारचा आदेश असताना अनेक शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने तर फी न भरणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणात बाहेर काढल्याचा आरोप पालकांनी केला. याबाबत सकाळी 8 वाजता शाळेत जात विचारपूस केली असता पालकांनाच शाळेच्या आवारात बंद करून ठेवले गेले. फी बाबत काही तो निर्णय घ्या आणि नंतरच शाळेच्या बाहेर जा, असा अजब पवित्रा शाळेने घेतला होता. शाळेचे मुख्य गेटलाच कुलूप लावल्याने शाळेत गेलेल्या पालकांना बाहेर जाता येत नव्हते. शाळेच्या या दादागिरी विरोधात काही पालकांनी गेटबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी शाळेत येऊन हस्तक्षेप करत पालकांना बाहेर काढले. त्यावेळी कोरोना काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना शाळा फी वाढवत असल्याचा आरोप पालक वर्गाने केलाय.


याबाबत पालकांनी शाळेविरोधात शिक्षणाधिकारी आणि खान्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोना काळात परिस्थिती हलाकिची असताना शाळेने समजून घेतले पाहिजे. तर काही पालकांची आर्थिक स्थिती ठीक असेल तर त्यांनी फी भरली पाहिजे. यासाठी पालकांच्या आयटी फाईल मागवून शाळेने तोडगा काढावा, असा सल्ला पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाला दिला आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली आहे.