मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी दिले जाणार अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. त्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत आज बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज मंजूर केलं. त्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एस कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य होणार आहे.


याबाबत अनिल परब म्हणाले की, "एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होता. महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणं कठीण होतं. गेल्या दोन-चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु होते. एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्याचं वेतन थकित होतं. त्यापैकी दिवाळीसाठी एका महिन्याचा पगार काल दिला. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नेहमी तयार होतो, म्हणन मी आज अजित पवारांकडे सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केली. त्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. कर्मचाऱ्यांना तिन्ही महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देणार आहोत. याबाबतची फाईल आज पुढे पाठवली असून कर्मचाऱ्यांना दोन दिवसात पगार मिळेल."


एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब


पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, संघटना आक्रमक


वेतनासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसह 'आक्रोश', इंटक संघटनेसह भाजप आक्रमक


एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन
एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेने काल (09 नोव्हेंबर) राज्यभर आक्रोश आंदोलन केलं. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधितही झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं.


जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार
कोरोनाच्या काळापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात एसटी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं लिहिलं आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक झाली आहे. दोन दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळीनंतर होणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. एसटी खाते मागील पाच वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी खाजगीकरण केल्याने एसटीवर ही वेळ आल्याचा गंभीर आरोप छाजेड यांनी केला.