मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं.


यावेळी परब म्हणाले की, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू.  दुःखी होऊन असं कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येतं.  दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल, असं परब म्हणाले.


परब म्हणाले की, पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आम्ही वेतनासाठी बँकेकडे कर्ज पण मागितलं आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल. आम्ही राज्य शासनाकडे एकरकामी पैसे मागितले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे.  आता एसटी साठी कोणतंही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. त्यामुळं पैसे आणण्याची साधनं वाढवण्यास मदत होईल, असं परब यांनी सांगितलं.


एस टी ला राज्यशासनाने मदत केली आहे यापुढेही करेल.  पैशांची तजवीज करायला हवी.  आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे.  1 पगाराचा प्रश्न सुटला आहे आणि 1 पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. अनेक माध्यमातून पैसे एस टी मध्ये येईल याची प्रयत्न सुरू आहेत.  पगार आणि डिझेलमध्ये पैसे खर्च होतात.  एक रकमी पैसे आले तर पुढचं प्लानिंग सोप्पं होईल, असं ते म्हणाले.


एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन


एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.  कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.


एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक
एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक झाली आहे.  2 दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळी नंतर होणार असल्याचा इशारा  इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.  हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. एसटी खाते मागील पंचवार्षिक पासून शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी खाजगीकरण केल्यानं एस टी वर ही वेळ आल्याचा गंभीर आरोप छाजेड यांनी केला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार-  रावसाहेब दानवे
दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे.  केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.


शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ
एसटी कामगारांचं तीन महिन्यांचं थकीत वेतन मिळावं यासाठी जालन्यात कामगारांनी कुटुंबियांसमवेत घरासमोरच आक्रोश आंदोलन केलंय. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे. दरम्यान या दिवाळीपूर्वी शासनानं आम्हाला थकीत वेतन, महागाई भत्ता आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल देण्यात यावी अशी मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.


पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, संघटना आक्रमक


जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार
कोरोनाच्या काळा पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन