मुंबई  : पान खाऊन थुंकल्यामुळे पडलेले डाग स्वच्छ करण्याची समस्या मोठी आपल्यासमोर आहे. पान खाऊन कुठेही थुंकण्यामुळे केवळ आरोग्यालाच धोका उत्पन्न होत नाही तर त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, स्मारके व सार्वजनिक वास्तूंचे सौंदर्यही नष्ट होते. रुईयाच्या विद्यार्थिनींनी यावर उपाय शोधला असून या प्रकल्पाला अमेरिकेमध्ये जागतिक संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. थुंकल्यामुळे पडलेले डाग काढण्याचा सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग या प्रकल्पात समाविष्ट आहे.


मुंबई शहरात उपनगरीय रेल्वेसाठी त्यांच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या इमारती, तसेच रेल्वे डब्यांमधील हे डाग नष्ट करण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. शिवाय यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तरीही डाग पूर्णपणे काढले जात नाहीत. या समस्येवर जैविक संश्लेषणच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना डॉ. मयुरी रेगे यांनी मांडली.

पानाचे डाग प्रभावीपणे दूर करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय शोधण्यात येत आहे. शिवाय हा उपाय स्वस्त असावा, असाही प्रयत्न यात करण्यात आला आहे. त्यानुसार पानाच्या डागाचा लाल रंग सुरक्षित रंगहीन उत्पादनात परिवर्तित करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा (मायक्रोब्स) आणि विकर (एन्झायम्सचा) या घटकांचा वापर या प्रकल्पात अंतर्भूत केला आहे. पान विक्रेते, स्थानकांचे व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, सफाई कामगार आणि सफाईचे काम करणाऱ्या संस्था यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही या घटकांच्या निर्मितीत अवलंब केला आहे.

अमेरिकेमधील बोस्टन स्थित मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)तर्फे घेण्यात आलेल्या जागतिक संशोधन स्पर्धेत रुईया महाविद्यालयाच्या या प्रकल्पाने सुवर्ण पदक पटकाविले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन साकारलेला हा प्रकल्प परिक्षकांच्याही विशेष प्रशंसेला पात्र ठरला आहे. यात रुईयाच्या युवा संशोधक विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकविण्याची चमकदार कामगिरी केली आहे. या संपूर्ण चमूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांना प्रमाणपत्र वितरित केली. या उपक्रमाची मुक्तपणे प्रशंसा करताना पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

एमआयटी विद्यापीठातर्फे दरवर्षी 'International Genetically Engineered Machines (IGEM)' ही जागतिक संशोधन स्पर्धा आयोजित केली जाते. जगातील उच्च दर्जाचे काही मोजके संशोधन प्रकल्प या स्पर्धेसाठी निवडले जातात. त्यानुसार या स्पर्धेत जगभरातून तीनशेहून अधिक संघ सहभागी झाले होते.

रुईयाच्या प्रकल्पाला बेस्ट इंटिग्रेटेड ह्युमन प्रॅक्टिसेससाठीचे विशेष पारितोषिकही देण्यात आले. या संघाचे बेस्ट प्रोजेक्ट अंडर एन्व्हायरनमेंट ट्रॅक आणि बेस्ट प्रेझेंटेशन या अन्य दोन विशेष पारितोषिकांसाठीही नामांकन झाले आहे.

रूईयाच्या या महत्त्वपुर्ण संशोधन प्रकल्पात सहभागींमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आंबरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. रुईयाच्या या आठ विद्यार्थिनींच्या चमुला डॅा. अनुश्री लोकुर, डॅा. मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुळकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.