मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत मुंबईकर सिग्नल फ्री प्रवास करु शकतील असा रिंगरुट तयार होणार आहे. सध्या सुरु असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत शिवडी-नवी मुंबई-विरार-वरळी असा मुंबईकरांचा सिग्नल फ्री प्रवास आकाराला येईल. येत्या दशकात आकाराला येणाऱ्या मुंबईच्या या रिंगरुटची एक महत्वाची कडी असणार आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक.


मुंबई दिवसेंदिवस विस्तारत आहे. मुंबईतल्या विकासाची गंगा आजूबाजूच्या शहरांपर्यंत गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात वेगवेगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांची साखळी मुंबईचं भविष्य आणि चेहरा मोहरा बदलवणारे ठरेल. त्यापैकीच एक आहे मुंबई पारबंदर प्रकल्प. मुंबई पारबंदर प्रकल्प--न्हावा-शेवा मार्गला इंग्रजीत ट्रान्स-हार्बंर लिंक म्हणतात. शिवडी ते रायगडमधील न्हावा-शेवा बंदराला जोडणारा 22 किमी लांबीचा समुद्रातला पूल हा भारतातला पहिला सर्वात मोठा समुद्री पूल म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे, भविष्यातली मुंबई याच पुलाच्या माध्यमातून भविष्यातल्या रिंगरुटवर सिग्नल फ्री वळणं घेऊ शकेल.


मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी ही विरार अलिबाग मल्टीमोडल प्रकल्पासाठी असेल. तसेच भाईंदर विरार ब्रिजचेही काम सुरु आहे. या विरार ब्रिजला विरार अलिबाग मल्टीमोडल प्रकल्पाची जोड असेल. कोस्टल रोडला हा प्रकल्प पुढे जोडला जाईल. त्यामुळे कोस्टल रोडने वरळीपर्यंतचा प्रवास करता येईल. एमटीएचएल प्रकल्पाचा भाग असलेल्या दुसऱ्या टप्प्यात वरळी शिवडी या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीने हा रिंगरुटचा मार्ग पूर्ण होईल. सध्या रिंगरुटचा मार्ग कुठे कागदोपत्री नाही, पण 2030 अखेरीस हा रिंगरुट तयार होईल.



मुंबईसोबतच आजूबाजूच्या शहरांमध्ये विकासाची वाट घेऊन जाणारा ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या प्रकल्पाचं जवळपास 50 टक्के काम पूर्ण झालं आहे आणि सप्टेंबर 2022 पर्यंत समुद्रावरचा हा पूल तयार झालेला असेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

शिवडी भागात या प्रकल्पाच्या उभारणीवेळी पर्यावरणप्रेमींकडून याला कडाडून विरोध झाला तो इथे येणाऱ्या शुभ्र फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यामुळे. एकीकडे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या वावरासाठी अडथळा नको म्हणून साऊंड बॅरिअर लावण्यात आले आहेत. तसेच टाटा पॉवरसारख्या कंपनीच्या जागेतही व्हिजन बॅरिअर लावण्यात आले आहेत. मात्र, या प्रकल्पात अडथळा ठरणारे 900 पेक्षा जास्त झाडं मात्र इथून हटवली जाणार आहेत.


मुंबईचा विस्तार कुठपर्यंत होणार?


- ठाणे खाडीवर उभ्या राहणाऱ्या 22 किमी लांबीच्या पुलाने दक्षिण मुंबईतले शिवडी भाग नवी मुंबईला जोडला जाईल.
- या प्रकल्पामुळे, मुंबई शहर थेट रायगडशी जोडलं जाणार आहे.
- रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिर्ले गावापर्यंत मुंबईचा विस्तार होणार आहे.
त्यामुळे, रायगड जिल्ह्यातील नाव्हा-शेव्हा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत पोहोचता येणार आहे.
- हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबतही जोडला जाईल, ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडची वाहतूक सुलभ होईल



वेळेची बचत कशी होणार?


1) शिवडी ते नवी मुंबई - प्रवासाचा सध्याचा वेळ- 2 तास, प्रकल्पानंतर- 20 ते 30 मिनिटं
2) दक्षिण मुंबई -रायगड जिल्हा- प्रवासाचा सध्याचा वेळ 2 तास, प्रकल्पानंतर - 30 मिनिटं
3) वांद्रे-वरळी सीलिंकही या नव्या पुलाला आंतरमार्गाने जोडला जाणार
4) प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही दक्षिण मुंबईहून कमी वेळात गाठता येईल.



कसा आहे मुंबई पारबंदर प्रकल्प?


- मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.


- यात एक अतिरिक्त आपात्कालीन मार्गिकाही असणार आहे.


- या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी तर जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.


- या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) प्रस्तावित आहेत. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.


- हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे


- या प्रकल्पाचा खर्च 17 हजार कोटींच्या घरात आहे...


सतत वाढणाऱ्या मुंबईने जमिनीवरुन, आकाशातून, समुद्रातून, पृथ्वीच्या पोटातूनही मार्ग काढले. ही वाढणारी मुंबई आता दिवसेंदिवस बाहेर फोफावत आहे. मात्र, या फोफावणाऱ्या मुंबईचं विद्रुप, बकाल स्वरुप होणं थांबवयाचं असेल तर अशा प्रकल्पांची महत्त्वाकांक्षा बाळगायलाच हवी.