ठाणे : जलवाहतुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतर घोडबंदर येथून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे केवळ एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. जलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज-1 ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर, आता फेज-2 चा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.
ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-2 चा जलमार्ग आहे. याचा शक्याशक्यता अहवाल तयार केला असून तो 24 एप्रिल रोजी सादर केल्यानंतर डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा भार 20 टक्क्यांनी हलका होणार असून, घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी सध्या दोन तास लागतात, तोच प्रवास एक तासात पूर्ण होईल असा दावा केला जातो आहे.
दुसऱ्या टप्प्यातील वाहतुकीमध्ये साकेत खाडीकडून ही जलवाहतूक सुरू होणार असून त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया व्हाया ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरी वार्फत्याचप्रमाणे ठाणे ते नवी मुंबई (पनवेल, जेएनपीटी) असा जलमार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर तो केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल. जलवाहतूक हा रस्ते वाहतुकीला सक्षम पर्याय ठरल्यास सध्या ठाणे व मुंबईत होणारी वाहतूककोंडी बऱ्याच अंशी कमी होईल.
असा आहे फेज-२ चा मार्ग
ठाणे ते मुंबईचा जलमार्ग ठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरु वात होणार असून त्यानंतर कळवा-विटावा-मीठबंदर-ऐरोली-वाशी-ट्रॉम्बे-एलिफंटा-फेरी वार्फ-गेट वे ऑफ इंडिया.
ठाणे-नवी मुंबईचा मार्गदेखील साकेतपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वाशी-नेरूळ-बेलापूर-तळोजा-तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून व्हाया जुईनगरला जाणार आहे. तर, अजून एक मार्ग जेएनपीटी आणि उरणमार्गे नेरूळला जाणार आहे.
किती फायदा होईल ?
या जलमार्गामुळे 20 % ट्राफिक कमी होण्यास मदत होईल. ठाणे ते मुंबई किंवा पनवेलला रस्त्याने जाण्यास लागणाऱ्या इंधनापेक्षा अंदाजे 33 % इंधनाची बचत होईल. यामुळे 42 % प्रदूषण कमी होईल असाही दावा केला जातो आहे.