मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वाद आणि गटबाजीमुळे, महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीला स्थगिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत संजय निरुपम यांच्या गटातील उमेदवारांचाच वरचष्मा असल्याची आणि इतर उमेदवारांना डावलण्यात आल्याची टीका झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद आणि संजय निरुपम यांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
लवकरच, पहिल्या यादीतील आक्षेप असलेल्या जागांवर उमेदवारांच्या फेरबदलीचा विचार केला जाईल. त्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या यादीत जागा पटकावलेल्या अनेकांची उमेदवारी रद्द होऊ शकते तसंच, अनेकांना नव्याने या यादीत स्थान मिळू शकतं.
गटबाजी रोखण्यासाठी भुपेंद्रसिंह हुड्डांची मध्यस्थी
मुंबई काँग्रेसमधले वाद आणि निरुपम विरुद्ध कामत गटबाजी रोखण्यासाठी खास दिल्लीहून भुपेंद्रसिंह हुड्डा मध्यस्थी करण्यासाठी रात्री मुंबईत दाखल झाले.
मात्र, हुड्डा थांबलेल्या हॉटेल ललितला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: घेराव घातला. हुड्डा यांच्यासोबत वादावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रिया दत्त, नसिम खान, चरणसिंग सप्रा, संजय निरुपम हे देखिल हॉटेल ललित इथे दाखल झाले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा आक्षेप
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. उमेदवारांना तिकीटं विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसच्या अंतर्गत गोटात केला जात आहे. केवळ निरुपम समर्थक नसल्याने अनेक विद्यमान आणि अनुभवी नगरसेवकांनाही डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
केवळ तीन महिलांनाच तिकीट
काँग्रेसच्या पहिल्या यादीत मुंबई महिला काँग्रेसमधील केवळ तीन महिलांनाच तिकीटे देण्यात आली होती. मर्जीतल्या व्यक्तींच्या पत्नी, बहिण अशा नातेवाईक महिलांना कोणत्याही सबळ आधाराशिवाय तिकीट वाटप केल्याचा आरोप मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केला होता.
या यादीत बदल व्हावेत यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. अखेर अंतर्गत वाद आणि निरुपम यांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.