मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या 2013 मधील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच दोषी आरोपींची फाशी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर अशोक नवगिरे या आरोपीला न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. नवगिरे यांच्यावतीने अॅड. नितीन सातपुते यांनी युक्तीवाद केला होता.


खोट्या प्रतिष्ठेसाठीचा हा खटला दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचं स्पष्ट करत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर अशोक फलके या आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पोपट दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे या दोषींनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तर राज्य सरकारच्यावतीने फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. 1 जानेवारी 2013 रोजी सोनाईतील नेवासा फाटा इथे 3 तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.


आंतरजातीय प्रेमप्रकरणातून या तिघांची हत्या करण्यात आली होती. उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केलं म्हणून आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या तिघांची हत्या करण्यात आली होती. यापैकी धनवार आणि कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते तर सचिन घारुच्या मृतदेहाचे तुकडे करुन आरोपींनी कुपनलिकेत टाकले होते. नेवासा सत्र न्यायालयात सुरु असलेला हा खटला साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी नाशिक कोर्टात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं होतं. या खटल्यात एकूण 53 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली होती.


काय होतं प्रकरण?


अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावच्या गणेशवाडीतील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात बीएड शिकत होती. याच संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन घारु सोबत तिची मैत्री झाली आणि त्यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याप्रकरणाची कुणकूण दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर त्यांनी या तिघांना जीवे मारण्याचा कट रचला. पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, त्यांचे चुलत बंधू रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले, गणेश रघुनाथ दरंदले (मुलीचा भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मुलीटा मावसभाऊ), त्यांचे नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी एकेदिवशी सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करुन सचिन, संदीप आणि राहुल यांना बोलावले आणि त्यांची निर्घृण हत्या केली. यावेळी संदीप धनवारला सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून मारण्यात आले. तर तिथून पळून जाणाच्या प्रयत्न करणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने वार करून तर सचिन घारुचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये घालून खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं.