मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कुठलीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत आपल्या नेत्यांवर टीका केली जाते. कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबुज्या, मात्र आता कुठल्याही नेत्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. काल (27 जुलै) पार पडलेल्या भाजपच्या पहिल्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत ते बोलत होते.


मागील काही दिवसांत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या ट्रोलर्सकडून अतिशय खालच्या शब्दात उत्तर देण्यात आले. एका कार्यकर्त्याने तर कुत्र्याची उपमा दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर भाजपची सोशल मीडिया यंत्रणा अॅक्टिव्ह करुन दोन तासात हे वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडलं, अशा पद्धतीने आक्रमकपणे पलटवार करण्याचा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. इतकंच नाही तर शांत बसणे म्हणजे मान्य केले असे होईल असेही पाटील म्हणाले.


जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा भाजपला टोला


देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी


याबाबत बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राज्यातला आयटी सेल आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. राज्यात प्रदेश भाजपचे 67000 व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. मात्र तरीही अपेक्षित असं काम आयटी सेलकडून होताना दिसत नाही, अशा कानपिचक्याही नड्डा यांनी दिल्या. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना सोशल मीडियावर आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.


त्याचसोबत सरकारचे अपयश आणि प्रदेश भाजपने केलेलं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजकीय कार्यकर्ता घडवण्यासाठी सध्या कंटेंट तयार करुन त्यांना राजकीय प्रवाहात सक्रिय ठेवण्याची जबाबदारी प्रदेशला देण्यात आली आहे. तसेच महिला, युवा, दलित, बुद्धिजीवी अशा विविध वर्गाशी महिन्यातून किमान पाच जनसंवाद आयोजित करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.


VIDEO | कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबुज्या; पण आता खपवून घेऊ नका, पलटवार करा : चंद्रकांत पाटील