मुंबई : मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं म्हणजे, सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्टचं... परंतु, आता तुमचं स्वप्न खरं होणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मुंबईकरांवा फक्त 30 लाखांमध्ये घरं खरेदी करता येणार आहेत. सध्या मुंबईतील घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरांत पोहोचल्या आहेत. अशातच ही गृहनिर्माण योजना म्हणजे, सर्वसामान्यांसाठी पर्वणीच असेल.


'जर केंद्र सरकारने वेळेत या योजनेला परवानगी दिली, तर गोरेगावसारख्या भागांत मुंबईकरांना अवघ्या 30 लाखांत घर खरेदी करता येणार आहे.' , अशी माहिती या योजनेसंदर्भात बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच या गृहनिर्माण योजनचं भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचीही माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकार ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्याची शक्यता आहे. तसेच 'ही जागी खाजगी मालकीची आहे आणि तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पण, मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, असं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


मुंबईतील घरांच्या किमती एकीकडे कोटीच्या कोटी उड्डाणं घेत आहेत. अशातच या योजनेमुळे गोरेगावसारख्या मध्यवर्ती भागात 30 लाखांत घर मिळणार असेल तर मात्र घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असेल. परंतु, अद्याप या योजनेला केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. तसेच घरं बांधण्यासाठी इतर परवानग्या मिळणंही आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील


महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल 28 हजारापेक्षा जास्त आकारता येणार नाही : राजेश टोपे