मुंबई : भाजपच्या नेत्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिहं यांनी भेट घेतली. या भेटीत भाजप नेत्यांनी दोन मागण्या केल्या आहेत. राज्यभरात पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून खालच्या भाषेत होणारे ट्रोलिंग रोखावं, या मागण्या भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केल्या आहेत.


गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियामधून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही विकृत प्रवृत्ती राजकीय पाठबळ घेऊन घाणेरडे कमेन्ट्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. राज्यभर जनताही या विषयी नापंसती व्यक्त करत आहेत, कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील एक लोकाभिमुख नेते आहेत. सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न नेते आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करणे व आपले कोरोनामधील अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. त्यामुळे यासंदर्भात कायद्याने न्याय मिळाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचे प्रयत्न भाजपच्या माध्यमातून करण्यात येईल असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.


पोलीस हे देव माणूस आहेत, असे केवळ बोलून चालणार नाही. पोलिसांवर सुरक्षेचा ताण असताना त्यांच्यावर हल्ले वाढत आहेत, ते सुरक्षित नाहीत. पोलिसांनाही कोरोना व्हायरसची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार, असं भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.


'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह


पोलिसांवर हल्ला प्रकरणे


लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 171 घटनांची नोंद झाली असून यात 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 51 पोलीस अधिकारी व 291 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 262 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.


BLOG | पोलीस हवालदार, शिपाई अन् नाईक यांच्या व्यथा..