Mumbai Pune Expressway News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. या दरडीमुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ही वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे. असं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.


दुसऱ्या दरडीमुळे म्हणजेच लोणावळ्याजवळील छोटी दरड कोसळल्यामुळे तळेगाव टोलनाक्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांची रांग रावेत कुळवेपर्यंत (म्हणजे एक्सप्रेस वे सुरु होतो तिथपर्यंत) होती. मात्र, आता वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे असं यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. 


पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) अद्याप ही वाहतूक विस्कळीत आहे. आडोशी बोगदा आणि लोणावळा जवळ दरड कोसळल्यानं गेल्या अनेक तासांपासून हीच परिस्थिती आहे. आडोशी बोगद्याजवळ एक लेन बंद असल्याने आत्ता बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा आहेत. वाहतूक धीम्या गतीनं असल्यानं मुंबईकडे जाणाऱ्यांना अधिकचा वेळ वाया घालवावा लागतोय.


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या सुमारास पहिली दरड कोसळली


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Expressway) आडोशी बोगद्याजवळ रात्री 22.35 च्या सुमारास दरड कोसळली आहे. यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मौजे आडोशी गावच्या हद्दीत (km. No.41/00) जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. सदरचा मातीचा लगदा हा आयआरबीच्या जेसीपी, डंपरच्या साहाय्याने काढून टाकण्याचे काम सुरु आहे. साधारणतः 20 ते 25 डंपर लगदा रोडमध्ये पडलेला आहे. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.


आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.