Mumbai Weather Update : मुंबईत (Mumbai) पावसानं आठवडाभर धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. यासोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं आहे. हवामान खात्याने आज मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागर आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. यामुळे पुढील आठवडाभर मुंबईसह देशभरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातपासून केरळपर्यंत संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर दाट ढग दिसून येत आहेत. यामुळे या भागात पाऊस सक्रिय राहणार आहे. पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई अंशतः ढगाळ वातावरण सुरु असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कारवार आणि केरळ या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत शनिवारी सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबई आणि उपनगरात गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी 40-70 मिमीच्या आसपास पाऊस झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईने शनिवारी यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गेल्या 24 तासांत त्याच्या सांताक्रूझ वेधशाळेत 203.7 मिमी आणि कुलाबा किनारपट्टीच्या वेधशाळेत 103 मिमी पावसाची नोंद केली आहे.
मुंबई, ठाण्यात विक्रमी पावसाची नोंद
मुंबईसह ठाणे, कल्याण या भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात 204 मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात चोवीस तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा हाह:कार
मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यानाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही भागात शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिल्ली, गुजरातसह उत्तर भारतात पूरस्थिती
राजधानी दिल्लीत पावसाचा जोर कायम आहे. संपूर्ण दिल्ली पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच गुजरात राज्यातही पावसामुळं अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे धरणे आणि नद्यांची पाणी पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढली आहे. त्यामुळं काही गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि रहिवाशांची गैरसोय झाली.