नवी मुंबई : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबईत येताना किंवा मुंबईतून बाहेर जाताना वेळ खाणारा सायन-पनवेल महामार्ग आता नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

पुण्याहून निघालेला व्यक्ती दीड तासात बेलापूरपर्यंत पोहोचतो. पण बेलापूरपासून वाशीपर्यंतचं अवघ्या 10 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तासाभराचा वेळ जातो.

अनेकदा डागडुजी करुनही या रस्त्याची अवस्था सुधारली नाही. त्यामुळे या महामार्गाची मालकी आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नवी मुंबई महापालिकेकडे दिली जाणार आहे.

महापालिकेतील महासभेत याबाबत प्रस्ताव पास करण्यात आला. लवकरच महापालिका सायन-पनवेल महामार्ग हा पामबीच रस्त्याप्रमाणे तयार करणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांप्रमाणेच सायन-पनवेल महामार्गही खड्डेमुक्त कधी होणार, याची उत्सुकता वाहनधारकांना लागली आहे.