मुंबई : केंद्र सरकारने मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. 1 जानेवारीपासून मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची दिल्लीत घोषणा केली.


मुंबईत जवळपास 65 लाखापेक्षा जास्त लोक रोज लोकलने प्रवास करतात. गेल्या अनेक दिवसांपासून एसी लोकल सुरु करण्यासंदर्भात विविध डेडलाईन दिल्या जात होत्या. पण तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरु करण्यास अडथळे येत होते.

पण आता ही सेवा 1 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

सद्या ही सेवा पश्चिम रेल्वे मार्गावर चालवली जाणार आहे. या लोकलच्या दिवसाला सात फेऱ्या होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, एसी लोकल सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच याचं भाडंही दिल्ली मेट्रोच्या दराप्रमाणेच असणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.