मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अन्य काही आरोपींच्या जामीनाला अंमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने त्यावर 30 मार्च रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं होता. यासंदर्भात एनसीबीनं गुन्हा दाखल करून अनेक सेलिब्रिटिंची चौकशी केली. त्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीनं ड्रग्जची खरेदी-विक्री आणि सेवन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला मुंबई सत्र न्यायालयातील एनडीपीएस न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात आता एनसीबीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. शौविकसह अन्य काही आरोपींना देण्यात आलेला जामीन हा अयोग्य असल्याचा दावा करत तो रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.


Coronavirus | आजही राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा मोठाच; संकट कायम 


एनडीपीएस कायदातील कलम 37 लावलेलं असतानाही त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. म्हणून शौविकसह अन्य काही आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर यावर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, दोन आरोपींना अद्याप या याचिकेची प्रत न मिळाल्यामुळे त्यांना ती देण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देत हायकोर्टानं सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब केली.