ठाणे : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीचा पुरवठा बंद झाल्याने ही वेळ ओढवल्याचे समजते आहे. 


आता ठाणे महापालिका क्षेत्रात कोविशील्डऐवजी कोवॅक्सिन लसीचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची गैरसोय होण्याची भीती ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती करुन कोविशील्ड लसीचा महापालिकेला पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे. 


ठाणे शहरात 11 खाजगी आणि 42 शासकीय अशा 53 ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरु असून सीरमच्या कोविशील्ड लसीद्वारे दररोज सुमारे 7 हजार 500 नागरिकांचे लसीकरण होते. आजपर्यंत पहिल्या टप्प्यातील 82 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सद्यस्थितीत कोविशील्ड लसीचा साठा संपत आला असून जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे  कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.