मुंबई : सचिन वाझे यांचे तीन अर्ज मंगळवारी (16 मार्च) एनआयए कोर्टाने फेटाळून लावले आहेत. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही, सरकारी अधिकाऱ्याला अशाप्रकारे अटक करता येत नाही, अटकेची प्रक्रिया बकायदेशीर आहे हे दावे एनआयए कोर्टाने फेटाळून लावले. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.


सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक केली, अशी स्पष्ट माहिती एनआयएने सोमवारी (15 मार्च) मुंबई सत्र न्यायालयात दिली होती. याशिवाय सचिन वाझे हे चौकशीला येताना सोबत आपला फोन घेऊन आले नव्हते, तसेच ते कुटुंबियांचा नंबरही देण्यास तयार नाहीत. म्हणून मग शेवटी त्यांच्या पोलीस स्टेशनलाच रात्री उशिरा त्यांच्या अटकेची माहिती द्यावी लागली अशी माहिती तपास यंत्रणेने कोर्टात दिली. मात्र आपली अटक बेकायदा असून आपल्याला वकिलांशीही भेटण्यास दिलं जात नसल्याचा आरोप करत सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात अर्ज दाखल केला होता.


मात्र एनआयएने हे आरोप फेटाळून लावत वाझेंना वकिलाशी भेटू देण्यात काहीच अडचण नाही, असं स्पष्ट केलं. तसेच एनआयएच्या इंटरोगेशन रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची तक्रार वाझेंच्या वतीने कोर्टात करण्यात आली. हा देखील आरोप एनआयएने फेटाळून लावत सर्वत्र सीसीटीव्ही असल्याचं कोर्टात सांगितलं. वाझेंना शनिवारी दिवसभर एसपींच्या केबिनमध्ये बसवलं होतं. जिथे कॅमेरा नाही, पण इंटरोगेशन रुममध्ये सीसीटीव्ही असल्याची कबुली एनआयएकडून कोर्टात देण्यात आली. वाझेंची चौकशी करताना त्यांच्या केस डायरीत काही अनियमितता आढळल्या म्हणून सहाय्यक आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, असंही एनआयएने कोर्टाला सांगितलं.