मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षात झालेला बदल आणि कॉर्पोरेट बिझनेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची वैद्यकीय सेवा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, कोविड महामारीत अनेकांनी रुग्णालयातील लुटालुटीच्या प्रकाराचा अनुभव घेतला आहे. एकीकडे खासगी वैद्यकीय सेवा महागडी होत असून दुसरीकडे शासनाच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने सर्वसामान्यांची ससेहेलपाट होताना दिसून येते. अनेकदा सरकारी रुग्णालयात (Hospital) डॉक्टर उपलब्ध नसतात, डॉक्टर असले तर सुविधा नसतात. तर, काही वेळा संबंधित डॉक्टर हे खासगी रुग्णालयांना रेफर करतात. त्यामुळे, वैद्यकीय श्रेत्रात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्यातच, आता मुंबईतील (Mumbai) एका सरकारी रुग्णालयात चक्क सफाई कर्मचारीच रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  


मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील एक गंभीर प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे. हा सफाई कर्मचारी रुग्णांचे ECG करत आहेत. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला आहे. शताब्दी रुग्णालयात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि  कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच, येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचे समोर आल्याने चांगलाच गोंधळ उडाला असून रुग्णालयातील भीषण वस्तुस्थितीच समोर आली आहे.


रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याबाबत जाब विचारलं पण डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता आहे आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण दिलं आहे, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने नेमकं काय चाललयं, असा गंभीर प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे सफाई कर्मचारीच गेले काही दिवस हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी रुक्साना सिद्दिकी यांनी केली आहे. तसेत, यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलतना सांगितले.


हेही वाचा


दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्धच्या कारवाई नाही